Global teacher Ranjitsinh Disle.

 *गल्ली ते ग्लोबल असा आहे डिसले गुरुजींचा  थक्क करणारा प्रवास* 


करकंब (सोलापूर) : युनेस्को आणि लंडन येथील वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिल्या जाणाऱ्या सात कोटी रुपयांच्या ग्लोबल टीचर पुरस्कारासाठी सोलापूर जिल्ह्यातील रणजितसिंह डिसले या जिल्हा परीषदेच्या प्राथमिक शिक्षकाच्या नावाची घोषणा अभिनेते स्टीफन फ्राय यांनी केली आणि अतिशय सामान्यातल्या सामान्य कुटुंबातील या मराठमोळ्या शिक्षकाने आपल्या आई-वडिलांना मिठीच मारली.


फक्त सोलापूर जिल्हाच नाही तर महाराष्ट्र राज्य आणि भारत देशाचेही नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकावणाऱ्या डिसले गुरुजींचा इथंपर्यंतचा प्रवासही तितकाच खडतर आहे; नव्हे नव्हे शून्यातून जग निर्माण करणे काय असते, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे डिसले गुरुजी. जनावरांच्या गोठ्याला विद्येचे मंदिर बनविताना त्यांनी फक्त विद्यार्थीच घडविले असे नाही तर शिक्षणाच्या क्षेत्रात त्यांनी केलेल्या क्रांतिकारक बदलांची दखल राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील शिक्षणतज्ज्ञांना घेणे भाग पडले.

त्यांच्या या अतिशय खडतर पण आश्वासक वाटचालीविषयी आणि त्यांच्या अभिनव उपक्रमांविषयी...


बार्शी तालुक्‍यातील साकत हे एक छोटेसे गाव. याच गावातील रणजितसिंह डिसले नावाचा एक युवक 2009 साली माढा तालुक्‍यातील परितेवाडी येथे प्राथमिक शिक्षक म्हणून रुजू झाला. नोकरी मिळाल्याच्या आनंदात हा नवनियुक्त गुरुजी शाळेवर हजर होण्यासाठी गेला खरा, पण शाळेची अवस्था पाहून काही क्षणात त्याचा आनंद कुठल्या कुठे पळून गेला. कारण, उद्याच्या भारताची पिढी घडविताना विद्यार्थीरूपी मातीच्या गोळ्याला आकार देण्याचे स्वप्न घेऊन आलेल्या रणजितसिंह डिसले यांनी पडझड झालेल्या शाळेच्या वर्गखोलीत अक्षरशः शेळ्या बांधलेल्या पाहिल्या.


या अवस्थेतही त्यांनी स्वतःला लगेच सावरले आणि प्राप्त परिस्थितीतही झोकून देऊन काम करण्याचा निश्‍चय केला. आपल्या मुलांनी शाळेत गेले पाहिजे आणि शिक्षण घेऊन उत्तम नागरिक बनावे, या विचाराचा तेथील पालकांमध्ये लवलेशही नव्हता. म्हणून त्यांनी प्रथम पालकांचे प्रबोधन केले. पण तरीही मुले शेतातील कामावर, गुरांच्या मागेच जात असत. तेव्हा रणजितसिंह डिसले यांनी मुलांना घरी जाऊन तर कधी वेळप्रसंगी अगदी शेतामध्ये जाऊनही गाडीवर बसवून शाळेत आणले. पण मुलांना शाळेत आनंद वाटला पाहिजे म्हणून पहिले सहा महिने त्यांनी पुस्तकाला साधा हातही लावला नाही. आपल्या मोबाईल व लॅपटॉपच्या साह्याने त्यांनी मुलांना गाणी, गोष्टी, कार्टून यामध्ये रमवून ठेवले. त्यामुळे मुलांमध्ये हळूहळू शाळेविषयी गोडी निर्माण होऊ लागली. आणि ज्या शाळेची जागा जनावरांनी घेतली होती तेथे तब्बल आठ महिन्यांनंतर वर्ग भरण्यास सुरवात झाली. रणजितसिंह डिसले यांच्या मार्गदर्शनामुळे आता हळूहळू पालकांना शाळेचे महत्त्व पटू लागले होते.


अशांत देशांसाठी पीस आर्मी

जगातील आठ देशांमध्ये अशांतता नांदत असून देशातील शांततेवरच त्या-त्या देशाचा विकास अवलंबून असतो, हे लक्षात घेऊन रणजितसिंह डिसले या साध्या प्राथमिक शिक्षकाने या आठ देशांचा अभ्यास करून तेथील नागरिकांना नेमके काय वाटते, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांना एक भयानक पण आश्वासक असे वास्तव लक्षात आले. भारत-पाकिस्तान, इराण-इराक, इस्राईल-पॅलेस्टाईन आणि अमेरिका-उत्तर कोरिया या आठ देशांमध्ये कायम अशांतता व एकमेकांच्या विरोधात माथी भडकाविण्याचे काम संधिसाधू व्यक्ती व गटांकडून होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. या पार्श्वभूमीवर रणजितसिंह डिसले सरांनी "लेट्‌स क्रॉस द बॉर्डर' हा प्रोजेक्‍ट राबविला आहे. याअंतर्गत त्यांनी या आठ देशांतील तब्बल पाच हजार विद्यार्थ्यांची "पीस आर्मी' तयार केली आहे. या देशांमध्ये ज्या-ज्या वेळी तणाव निर्माण होईल, त्या-त्या वेळी हे विद्यार्थी एकमेकांशी संपर्क साधून त्या-त्या देशातील जनजीवनाविषयी व सर्वसामान्य लोकांच्या भावनांविषयी जाणून घेतात आणि प्रसारमाध्यमातून येणाऱ्या खोट्या बातम्यांचा पर्दाफाश करतात. अगदी अलीकडेच पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतरही भारत आणि पाकिस्तानमधील विद्यार्थ्यांनी एकमेकांशी चर्चा करून दोन्ही देशांतील जनभावना जाणून घेतल्या, तेव्हा वास्तव काही वेगळेच आणि प्रसारमाध्यमातून काही वेगळेच जनेतसमोर आणले जात असल्याचे निरीक्षणही त्यांनी नोदवले.


भारतीय शिक्षण पद्धतीत तंत्रज्ञानाचा वापर वाढला पाहिजे

परदेशातील शिक्षण पद्धती जाणून घेताना भारतीय शिक्षण पद्धतीचा तुलनात्मक अभ्यास करता, भारतात प्रचंड लोकसंख्या हा मुख्य अडसर असल्याचे लक्षात येते. यावरही रणजितसिंह डिसले यांनी विचार केलेला आहे. परदेशात 18 ते 20 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक असे प्रमाण असते तर भारतात मात्र हेच प्रमाण प्रतिशिक्षक पन्नास ते साठ विद्यार्थी एवढे असते. यावर उपाय सुचविताना रणजितसिंह डिसले म्हणतात, "भारतीय अर्थव्यवस्थेचा विचार करता आपल्याकडे परदेशाप्रमाणे शिक्षक नियुक्ती शक्‍य नाही. पण अध्यापनात तंत्रज्ञानाचा वापर आपण वाढविला तर शिक्षणाची उद्दिष्टे आपण सहज पूर्ण करू शकतो. पण हे करत असतानाही शिक्षण क्षेत्र हे राजकारणापासून अलिप्त असले पाहिजे. आपल्याकडील नेत्यांना आणि मंत्र्यांना शिक्षण पद्धतीत बदल करण्याचे अधिकार असता कामा नये. शिक्षकांना पूर्ण स्वातंत्र्य असावे. केवळ पाठ्यक्रम पूर्ण करणे एवढेच शिक्षकांचे काम नसून उद्दिष्टे पूर्ण करताना त्याला जे काही प्रयोग अथवा उपक्रम राबवायचे आहेत त्यासाठी शिक्षकांना स्वातंत्र्य आणि प्रोत्साहन मिळाले पाहिजे.'


रणजितसिंह डिसले यांचा सातासमुद्रापलीकडे झेंडा

रणजितसिंह डिसले हे परितेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिक्षक आहेत. मागील नऊ वर्षाच्या काळात तंत्रज्ञानातील नावीन्यपूर्ण उपक्रम व असामान्य कार्य यामुळे ते जगभरातील सर्वोत्तम पन्नास इनोव्हेटिव्ह शिक्षकांच्या यादीत विराजमान आहेत. जिल्हा परिषदेच्या शिक्षकांचा ग्लोबल चेहरा म्हणून त्यांची जगभरात ओळख झाली आहे. मायक्रोसॉफ्ट, गूगल, ब्रिटिश कौन्सिल, प्लिपग्रीड, प्लिकेर्स यांसारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांसोबत ते कार्यरत असून, सध्या "व्हर्च्युअल फिल्ड ट्रीप' या आगळ्यावेगळ्या शैक्षणिक प्रयोगाच्या माध्यमातून जगभरातील 87 देशातील 300 हून अधिक शाळांमधील मुलांना शिकवण्याचे काम करतात.


गेल्या नऊ वर्षांच्या सेवेत त्यांना 12 आंतरराष्ट्रीय व 7 राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. याशिवाय बारा शैक्षणिक पेटंट त्यांच्या नावावर आहेत. मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नाडेला यांनी रणजितसिंह डिसले यांच्या कार्याचा गौरव करणारी "हिट रिफ्रेश' ही विशेष चित्रफीत प्रकाशित केली असून असा मान मिळालेले ते जगातील एकमेव शिक्षक आहेत. अवघ्या 28 व्या वर्षी मायक्रोसॉफ्टची फेलोशिप मिळविणारे सर्वात तरुण प्राथमिक शिक्षक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. याशिवाय आज तब्बल 140 देशातील बारा हजार शिक्षकांमधून प्रथम मानांकन मिळवून त्यांना सात कोटी रुपयांचा ग्लोबल टीचर पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यामुळे आजपर्यंत गल्ली ते दिल्ली असा प्रवास सर्वांनीच अनुभवला असेल, पण "गल्ली ते ग्लोबल' असा प्रवास करणारे रणजितसिंह डिसले हे एकमेवाद्वितीय असावेत, यात शंका नाही.


संपादन : श्रीनिवास दुध्याल

No comments:

Post a Comment